अमर काणे / नितेश महाजन, झी २४ तास, जालना : स्वतःला सर्पमित्र म्हणवून घेणारे अनेक जण आहेत. पण साप पकडणं सोपं नाही. प्रशिक्षण नसताना साप पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जालन्यातल्या एका तरुणाला याची मोठी किंमत मोजावी लागलीय. आजकाल गल्लोगल्ली सर्पमित्र झालेत. जो उठतो तो स्वतःला सर्पमित्र असल्याचं सांगतो. पण सापांना हाताळणं म्हणजे मृत्यूशी खेळ असल्याचं अनेकदा सिद्ध झालंय. जालन्याच्या जाफ्राबादचा रवी हिवाळे यानं सुद्धा साप पकडण्याचं नसतं धाडस केलं. हे धाडस त्याच्या चांगलंच अंगाशी आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी शिकणाऱ्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या आवारात साप आला होता. रवी नुसती काठी घेऊन साप पकडण्यास गेला. त्यानं सापाला पकडलंही. सापाला लांब घेऊन निघाला असताना सापानं अचानक त्याच्या हाताला चावा घेतला, असं आपला अनुभव सांगताना रवी हिवाळे या विद्यार्थ्यानं म्हटलंय. 


वेळीच उपचार झाल्यानं रवी बचावला. पण साप हाताळतानाची बेफिकिरी आणि योग्य प्रशिक्षण नसल्यानं अनेक जण आपले जीव गमावून बसलेत, असं सर्पमित्र सांगतात. 


जुजबी ज्ञान घेऊन साप पकडण्यासाठी जाऊ नका... साप पकडण्यासाठी आवश्यक साहित्य असेल तरच साप पकडा, अन्यथा साप पकडणं जीवावर बेतू शकतं...