पुणे : वर्षभरापूर्वी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमामध्ये विजय दिवसाच्या निमित्तानं उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा सरकारनं ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळेच कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ आणि आजूबाजूची जागा २२ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत राज्य सरकारच्या ताब्यात राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तसे आदेशच सरकारला दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक जानेवारी रोजी विजय दिवसाच्या नियोजनासाठी या जागेचा ताबा मिळावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्याला मान्यता मिळाली.  ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान लोकांना या ठिकाणी अभिवादनास मान्यता देण्यात आली आहे. २२ डिसेंबरपासून विजय दिवसाच्या तयारीसाठी प्रशासनाने या जागेचा ताबा मिळवला. १२ जानेवारीला पुन्हा जागा २२ डिंसेबरला ज्या स्थितीत होती त्या स्थितीत जागा मालकाच्या ताब्यात द्यायची आहे.


जागा मालकाच्या पिकांचे नुकसान होणार नाही, अशी अट न्यायालयाने जागा सरकारच्या ताब्यात देताना घातली आहे. त्याचे पालन केले जाईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.


कार्यक्रमासाठी दोन कोटींचा निधी


दरम्यान, येत्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी तसेच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केलीये. यंदाही जवळपास १० लाख नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्यांच्यासाठी आवश्यक सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये देण्यात येणार आहेत.


प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे आणि शिक्रापूर येथून पीएमपीच्या १५१ जादा बस सोडल्या जाणार आहेत. तसेच खासगी वाहनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. ५ हजार पोलीस, १२ हजार होमगार्ड, एसआरपीएफच्या १२ तुकड्या आणि ४०० स्वयंसेवक येणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी सेवेत असतील.