दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभा सदस्याचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेत ही घोषणा केली.विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड जाहीर करताच माजी विरोधी पक्षनेते आणि आताचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वड्डेटीवार यांच्या जागेवर जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करून अभिनंदन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला, काँग्रेसने ४८ पैकी केवळ १ जागा जिंकली असून ती जागा चंद्रपूरची आहे. चंद्रपूरचे असलेले वड्डेटीवार यांनी या जागेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. 


स्वभावाने आक्रमक असलेले विजय वड्डेटीवार हे विधानसभेतही विविध मुद्यांवर आक्रमक असतात. त्यामुळे काँग्रेसने विखे यांच्यानंतर वड्डेटीवर यांची विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती करावी असं पत्र हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं.


अधिवेशन सुरू होऊन एक आठवडा उलटल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर निवड जाहीर करण्यात आली आहे. आता  अधिवेशनाच्या कामकाजाचे केवळ ७ दिवस शिल्लक असून हे या सरकारमधील शेवटचे अधिवेशन आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वड्डेटीवर यांचे अभिनंतद केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री विदर्भातील आहेत आणि विरोधी पक्षनेताही विदर्भातील झाला आहे. विदर्भाच्या विकासासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी चंद्रपूर जिल्ह्य़ातील आहे. विरोधी पक्षनेतेही चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष वड्डेटीवार यांना संधी देते मात्र निवडणूक संपल्यावर दुसऱ्यांना संधी देते. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपद पुन्हा तुमच्याकडेच राहणार आहे, त्यामुळे पुढेही त्यांना संधी द्या अशी मनापासून विनंती आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चिमटेही काढले.