प्रणव पोळेकर / रत्नागिरी  : दापोली तालुक्यातील भोपण रोहिदास वाडीला रस्ताच नसल्याने जिवंतपणीच मरण यातना भोगावे लागत आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष होऊन देखील रस्ताच नसल्याने डोलीचा आधार इथल्या ग्रामस्थांना घ्याव लागतोय. एक रिपोर्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातल्या रोहिदास वाडीत जायचं असेल जीवघेणी पायपीट ही ठरलेलीच. विकास विकास काय म्हणतात, तो या गावापासून शेकडो कोस लांबवरच राहिलाय. एखाद्याला दवाखान्यात न्यायचं झालं तर डोलीशिवाय पर्याय नाही.अडलेल्या बाया बापड्या पण अशाच डोलीतून नेल्या जातात. याच जीवघेण्या वाटेनं आजपर्यंत अनेक जीवही घेतलेत. पण गेल्या सत्तर वर्षांत यांचा आवाज कुठल्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचलायच नाही.



रात्री अपरात्री जीवघेण्या पाऊल वाटेने  चालताना कित्याकांचे हात पाय तुटले, याची तर गणती करणंही अवघड. गेल्या काही वर्षांत इथल्या रस्त्यासाठी पाठपुरावा केल्यावर दोन वेळा निधीही मंजूर झाला. भूमीपूजनही झालं.पण मुख्य रस्त्याच्या मुखाशी दोघांची जागा आहे. ते रस्त्यासाठी जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनीही सहमतीनं तोडगा काढण्य़ाची गरज आहे. 


गावात एखादा मृत्यू झाला, तर  चार खांद्यांवरुन नेणंही त्या पार्थिवाच्या नशीबात नसतं.  पार्थिव स्मशानात नेतानाही डोलीतच घालून न्यावं लागतं.  एकदा का अन्याय सरावाचा झाला की मृतदेहाला काय आणि हाडामासांच्या जिवंत माणसाला काय, अन्यायाचं काही वाटेनासंच होतं. दापोलीच्या भोपण रोहिदास वाडीचं तसंच झालंय.