बीड : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पार्थिवावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी मेटेंना श्रद्धांजली वाहिली. मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककळा पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या हजारो समर्थकांनी शोकाकूल वातावरणात आपल्या या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. त्याआधी बीडमधल्या तुकाई निवासस्थानासमोर पोलिसांनी त्यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली. शिवसंग्राम कार्यालयासमोर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंचा जनसागर उसळला होता.


मेटे यांचं पार्थिव काल रात्री मुंबईवरून बीड शहरामध्ये आणण्यात आलं.  बीडच्या तुकाई निवासस्थाना समोर पोलिसांकडून त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यात आली. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. त्यांच्या अंत्यदर्शनाला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी होती. त्यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.


विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


विनायक मेटे यांचं अपघाती निधन
बीडकरांचे लाडके नेते, मराठा आरक्षणाचा आवाज आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघातात निधन झालं. पुण्याहून मुंबईला जात असताना पुणे-मुंबई महामार्गावर त्यांचा गाडीला अपघात झाला. मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 


कोण होते विनायक मेटे
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील महाराष्ट्रातील प्रमुख नेते 
मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलन 
अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष 
मेटे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावातील
शिवसेना भाजप युती सरकारच्या काळातील आमदार 
सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य