Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप असताना आता नवनवीन दावे करण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटात असंतोष आहे. लवकरच याचा स्फोट होईल, असे म्हटले आहे. त्याचवेळी आता ठाकरे गटाकडून मोठा दावा करण्यात येत आहे. भाजपवर नाराज असलेले मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करताना गद्दारी करणाऱ्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडले जाणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले. 


'ठाकरेंचाच फॉर्म्युला, शिवशाहीची राजवट येणार' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुद्धा झालेली नाही.निश्चित फॉर्म्युला तयार झालेला नाही. आत्ता खासदारकीच्या जागा आमच्याकडे जास्त आहेत. त्यामुळे आमच्या जागा कायम ठेवून शिल्लक जागा समान ठेवायच्या असा फॉर्म्युला झाल्यास  तोडगा निघू शकतो.  जागांची अदलाबदली देखील होऊ शकते. कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले. 


किरीट सोमय्या यांनी आजपर्यंत केलेल्या तक्रारी फक्त बदनामीसाठी आहेत. 50 खोके आणि शंभर कोटीची विकास कामे, अशी आमिषे दाखवून शिवसेनेतील नेत्यांना जवळ घेतले. खोक्यांच्या बाबतीत टोकन असलं तरी विकास कामांच्या बाबतीत जवळ घेतलं नाही, हा असंतोष शिंदे गटाच्या आमदारात आहे. तो लवकरच उफाळून येईल. ज्यांनी उद्धव ठाकरे यांना फसवलं त्यांचे पितळ उघडे पडणार आहे, असा दावा यावेळी विनायक राऊत यांनी केला.


त्याचवेळी त्यांनी फडणवीस - राज ठाकरे भेटीवरही भाष्य केले. दोघांनाही काही काम नाही, म्हणून ते भेटत आहेत. भेटू देत आणि सुखी राहू दे, असे ते म्हणाले. महाविकासीत आघाडीत एका कुटुंबात भांड्याला भांडे लागले तरी भांड फुटू देणार नाही, याची आम्ही काळजी घेऊन. मात्र, मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात आहेत. पण गद्दारी करणाऱ्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


'मिंदे गटाला सोबत घेतल्यापासून तुमची पनवती सुरु'


दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ठाकरे गटातील अनेक नेते अस्वस्थ आहे. ते भाजपच्या संपर्कात आहेत, असे संकेत त्यांनी दिलेत. येत्या काळात याची तुम्हाला प्रचिती येईल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. ठाकरे गटाची चिंता देवेंद्र फडणवीस यांनी करु नये, असे प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी फडणवीस यांना दिले. एक ना धड भाराभर चिंद्या, अशी तुमची परिस्थिती आहे. मिंदे गटाला सोबत घेतल्यापासून तुमची पनवती सुरु आहे ते पाहा, असा टोलाही लगावला. त्याचवेळी ते म्हणाले, नितेश राणेला आम्ही किंमत देत नाही. तो टिनपाट माणूस आहे. नितेश राणे फक्त भुंकतो. भुंकणारा कुत्रा चावत नसतो.