मराठा आरक्षण सुनावणीबाबत चुकीची माहीती पसरवली जातेय- तावडे
पूर्वलक्षीप्रभावाने भरतीप्रक्रिया केली जाऊ शकणार नाही
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत काही जण चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप भाजपा नेते विनोद तावडे यांनी केला आहे. उच्च न्यायालयाची प्रत पूर्ण वाचल्याशिवाय मराठा आरक्षणावर स्थगिती देऊ शकणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पूर्वलक्षीप्रभावाने भरतीप्रक्रिया केली जाऊ शकणार नाही, असंही त्यात म्हटलंय. पण याचा चुकीचा अर्थ काढण्यात येत असल्याचे तावडे म्हणाले.
2012 आणि 2013 च्या भरतीप्रक्रियेवर उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याची अंमलबजावणी करत आहोत. आपण पूर्वलक्षीप्रभावाने भरती करत नाही. कुठलीही नोकर, भरतीप्रक्रिया किंवा शैक्षणिक प्रवेश थांबणार नसून ती सुरू राहील असेही तावडेंनी स्पष्ट केले. शासनाला भूमिका मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे 2014 च्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नोकऱ्या सोडाव्या लागणार नाहीत. अजून भरतीप्रक्रिया सुरू असून अशा सगळ्यांना कायद्याप्रमाणे सामावून घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.
दोन याचिकांवर सुनावणी
मराठा आरक्षणाविरोधातील दोन याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्य पीठापुढे आज महत्त्वपूर्ण सुनावणी सुरु होती. ओबीसी संघटनांकडूनही दोन आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला स्थगिती मिळू नये, यासाठी माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकिलांची फौज बाजू मांडत आहेत. तर आजच्या या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागलेलं असतानाच खासदार संभाजी राजे ही सुनावणी पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.