परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या धडक मोर्चाला हिंसक वळण लागलं. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. जिंतूर रोडवरील ईदगाह मैदानातून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पोहोचताच काही तरुणांनी गोंधळ सुरू केला. त्यावेळी तिथं आलेल्या रुग्णवाहिकेला त्यांनी रस्ता मोकळा करून दिला. पण रुग्णवाहिकेच्य पाठीमागे असलेल्या चारचाकी गाडीवर हल्ला चढवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलकांनी यावेळी पोलिसांच्या दिशेनंही दगडफेक केली. अग्निशमन दलाच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. एकूण ८ दुचाकी, १ ऑटो आणि ५ चारचाकी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. या दगडफेकीत परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांचा दात पडला. या दरम्यान आंदोलकांनी अॅड. सोनी यांच्या घराच्याही काचा फोडल्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तटरक्षक भिंतीवरून पोलीस अधीक्षकांनी उडी मारून आंदोलकाचा पाठलाग करून त्यांना पिटाळून लावलं.


महाराष्ट्रात नागपूर, औरंगाबाद, बीड, पुणे, हिंगोली, सांगली, परभणी या ठिकाणी आंदोलन झालं. बीडमध्ये आंदोलनादरम्यान जमावानं बसवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. हिंगोलीत अज्ञातांनी एसटीवर दगडफेक करून काचा फोडल्या.


परभणीत आंदोलनकांनी पोलिसांवर दगडफेक केली. हिंसक आंदोलनामुळे शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. तर शाळांनाही दुपारनंतर सुटी देण्यात आली. 


भारतीय नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहेत. अनेक राज्यांमध्ये याला हिंसाचाराचं स्वरुप लागलं. दगडफेक, जाळपोळ या सगळ्या धुमश्चक्रीत नागरिकांसह पोलीसही जखमी झाले आहेत. बिजनौर, मेरठ, कानपूर, आगरामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. देशातल्या अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्य़ात आली आहे.