नाशिक : नाशिकमध्ये लष्कर भरती दरम्यान लाठीमारचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. भरतीसाठी आलेल्या तरुणांवर लष्कराकडून लाठीमार झालाय. या व्हिडिओमध्ये तरुणांची पळापळ स्पष्टपणे दिसून येतेय. भरती दरम्यान प्रचंड गोंधळ असल्याचे देखील दिसतंय... केवळ ६८ जागांसाठी तब्बल १०,००० - १२,००० तरुणांची हजेरी दर दिवसाला आहे. 


रात्रीच्या वेळचा हा व्हिडिओ आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्यातीलच नाही तर इतर राज्यांतूनही बेरोजगार तरुण या ठिकाणी भरतीसाठी उपस्थित झाले होते. या तरुणांसाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत अनेकांनी फुटपाथवरच रात्र जागून काढावी लागली होती. 
  
दरम्यान या व्हिडिओमधून बेरोजगारीचं विदारक चित्र दिसून येतंय. याबाबत प्रशासन आणि सरकारनं गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे लष्कराकडे तरुणांचा असलेला ओढाही कमी होण्याची शक्यता तरुणांनी व्यक्त केलीय. सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातून आलेल्या या तरुणांना निराशा पदरी घेऊन घरी परतावं लागलं आहे.