मुंबई : गणेशोत्सव महाराष्ट्राचा महाउत्सव मानला जातो. आज अनंतचतुर्दशी असून 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे. कोविड 19च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच गणेशभक्तांनी साजरा केला. तर लागोपाठ दूसऱ्या वर्षी सुद्धा गणेशभक्तांना आपल्या जल्लोषाला कोविड १९ संसर्गामुळे मर्यादीत ठेवावा लागतोय. नियमांचं पालन करतच विसर्जन सोहळा पार पाडावा लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिस यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईची शान असणाऱ्या लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर्षी कोरोनामुळे गणेशभक्तांना लालबागच्या राजाचे प्रत्यक्ष दर्शन न घेता ऑनलाईन दर्शन घ्यावं लागलंय. यामुळे विसर्जन सोहळ्यात लालबागचा राज्याचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याची इच्छा गणेशभक्तांच्या मनात आहे. 


विसर्जन सोहळ्यात गणेशभक्तांची गर्दी उसळू नये यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा गिरगाव चौपाटी पर्यंत लाईव्ह ऑनलाईन पहाता येईल अशी व्यवस्थाही केली आहे. त्याचप्रमाणे दहशतवादी हल्ल्याचा इशारा आणि कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर विसर्जनस्थळावर कडेकोट बंदोबस्त, मुंबई पोलिसांनी राबवलं ऑपरेशन ऑलआऊट राबवण्यात आलं आहे.


विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई महापालिका देखील सज्ज आहे. विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्ती असाव्यात हे नियम पाळावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे या व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. शक्यतो लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाऊ नये. 


गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी केलीय. विसर्जनासाठी 173 कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तर घरगुती गणपतीची मूर्ती शाडु मातीची असेल तर घरीच विसर्जन करण्याची विनंतीही पालिकेने केली.