निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस कमी पडली -विश्वजीत कदम
विश्वजीत कदम यांची कबुली
मुंबई : निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस काहिशी कमी पडल्याची कबुली आमदार विश्वजीत कदम यांनी दिली आहे. कदम यांनी पलूस कडेगाव मतदारसंघातून तब्बल १ लाख ६२ हजार मतांनी विजय मिळवला. मात्र त्यांच्या मतदारसंघात नोटाला मोठ्या प्रमाणावर मतदान झालं. भाजपच्या लोकांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात घडवून आणलेलं ते मतदान आहे, आपल्या मतांवर फारसा परिणाम झाला नाही, असा दावा कदम यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. काँग्रेस पक्षाला ४४ जागा मिळाल्या. काँग्रेस कुठे कमी पडली याची कारणं देखील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. पुढची ५ वर्ष विरोधी पक्षाची जबाबदारी घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पक्षातील अंतर्गत वाद आणि स्थानिक पातळीवर पक्ष संघटन कमी पडल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यानंतर आता विश्वजीत कदम यांनी देखील याची कबुली दिली आहे.
शिवसेनेला पाठिंबा नाही
दुसरीकडे स्वाभिमान गहाण न टाकता उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसारखा कणखरपणा दाखवावा असं आव्हान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचेही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. जी भूमिका पवार साहेबांनी घेतली आहे तीच काँग्रेसची भूमिका असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.