मुंबई : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्यांनी विरोधी पक्षाशी हातमिळवणी करण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. तर काहींनी विरोधी पक्षात प्रवेश करुन आपल्या पदरात उमेदवारी पाडून घेतली आहे. आता काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीत असलेले कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे. भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने विश्वनाथ पाटील नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचा आसरा घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.


विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसकडून स्टार प्रचारक म्हणून नियुक्त केले होते. मात्र, ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी न देता सुरेश टावरे यांना देण्यात आली. त्यामुळे कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील हे नाराज होते. त्यांची नाराजी काँग्रेसकडून दूर करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भिवंडी ग्रामीणमधून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी विश्वानाथ पाटील यांनी केली होती.