व्हिजिटिंग कार्डनं बदललं घरकाम करणाऱ्या महिलेचं आयुष्य, देशभरातून ऑफर
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
पुणे : स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड असणं हा एक स्टेटस सिम्बॉल मानला जातो. नोकरदार असो, व्यवसायिक असो, वा असो एखादा उद्योजक यांच्याकडे व्हिजिटिंग कार्ड नाही असं शक्यतो होत नाही. पण एखाद्या घरकाम करणाऱ्या मोलकरणीनं स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड छापून घेतलं तर मात्र आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पुण्यात अशाच एका कामवाल्या मावशीच्या व्हिजिटिंग कार्डची सध्या जोरदार चर्चा आहे.
पुण्यातील बावधान येथे राहणाऱ्या गीता काळे सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या विषय बनल्या आहेत. देशभरातून लोकं त्यांना नोकरीसाठी ऑफर करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचं काम सुटल्याने धनश्री शिंदे यांनी त्यांना व्हिजिटींग कार्ड बनवून दिलं होतं. त्यानंतर ते सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं.
धनश्री शिंदे यांना गीता काळे यांचं काम सुटल्याचं माहित झाल्यानंतर त्यांना हे कार्ड बनवून दिलं. पण आता त्यांना लागोपाठ फोन येत आहेत. काही लोकं तर त्यांना जास्त पैसे ही ऑफर करत आहेत. धनश्री यांनी फेसबूक पोस्ट करत म्हटलं की, 'मावशीचा फोन सतत वाजत आहे. देशभरातून नोकरीची ऑफर येत आहे.'