काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांनी आपल्या साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यात परतले आहेत. रविवारी हेलिकॉप्टरने ते ठाण्यात दाखल झाले. गावी असताना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे ते ठाण्यात आल्यानंतर अनेक नेतेमंडळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचले. विजय शिवतारेदेखील एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. ज्यामुळे ते चांगलेच संतापले. 
 
विजय शिवतारे यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी अडवली होती. तुम्ही कोण आहात, थांबा अशी विचारणा करत पोलिसांनी विजय शिवतारे यांना अडवलं. दरम्यान यामुळे विजय शिवतारे चिडले. पोलिसांनी ओळखलं नसल्याने विजय शिवतारेंनी पोलिसांना दम दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"तुम्हाला आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाहीत का? असं प्रत्येक वेळेस करतात. हे बरोबर नाही. तुम्ही किती वर्षं झाले काम करत आहात. अख्ख्या महाराष्ट्रभर गाडी फिरत असते. प्रत्येक वेळी तुम्ही असं करणं योग्य नाही", अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना झाडलं.


दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या भेटीसंबंधी विचारलं असता ते म्हणाले, "दोन दिवस त्यांची तब्येत खराब होती. ताप असल्यामुळे दरेगावी होते आणि काल दुपारी ते मुंबईत आले. मी औरंगाबादला होतो. त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी आलो होतो. क्टरांकडून त्यांच्या चाचण्या होत आहेत. मी त्यांना न भेटता श्रीकांत शिंदे यांना भेटून निघालो आहे". बैठकीची मला कल्पना नाही,  आमच्या कुठल्याही आमदारांची बैठक नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


मुख्यमंत्रिपद आणि गृहखात्यासंबंधी विचारलं असता त्यांनी म्हटलं की, "सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांचे आहेत आणि ते ठरवतील. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो 100 टक्के सर्वांना मान्य असेल. आम्ही कोणी त्या प्रक्रियेत नाही. सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत. ते जे निर्णय घेतील ते सगळ्या आमदारांना मान्य असतील".