रत्नागिरी : रत्नागिरी आणि सावंतवाडी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीत नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत चौरंगी लढत होतेय. शिवसेनेची सत्ता असलेल्या या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपनंही प्रतिष्ठेची केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीत ५८ हजार ७७० मतदार आहेत. तर ४९ केंद्रावरती हे मतदान होतं आहे. मतदान शांततेत होण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. रत्नागिरीत नगराध्यक्षाच्या पोटनिवडणुकीतील प्रचाराला भाजपच्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. 


तर सावतंवाडीत नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक होतेय. सहा उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी दीपक केसरकर आणि नारायण राणेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. 


दरम्यान, रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूकीसाठी चुरस पाहायला मिळतेय. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक पटवर्धन यांच्यासाठी काढण्यात आलेल्या प्रचारफेरीत भाजपाचे दिग्गज उतरले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे असे दिग्गज प्रचारासाठी रॅलीमध्ये उतरले होते. प्रचारादरम्यान नारायण राणेदेखील उपस्थित होते. 


नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. शहरात कायदा-सुव्यवस्था नसल्याने शहराचा विकास न झाल्याची टीका त्यांनी केली. शहराचा विकास झाला नाही यासाठी शिवसेना आणि शिवसेनेचे नगरपालिकेत असलेले नेते यासाठी कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली. 


या पोटनिवडणूकीत शिवसेना-भाजप आमने-सामने आहेत. त्यामुळे या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.