मुंबई : १४ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर डीएचएफएलचे कपिल वाधवान आणि त्यांचे भाऊ धीरज यांना पाचगणीवरून महाबळेश्वरला आणण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात वाधवान बंधू आणि त्यांच्या कुटुंबातले २१ जण पाचगणीला गेले होते. यानंतर १४ दिवस त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये वाधवान बंधूंना आरोपी करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सीबीआयने वाधवान बंधूंची कोठडी घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारने केली असल्याचं बुधवारी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून वाधवान बंधूंनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अटक करण्यात येऊ नये, अशी मागणाी वाधवान बंधूंनी त्यांच्या याचिकेत केली आहे.


१४ दिवसांचा क्वारंटाईन संपल्यानंतर वाधवान यांना कडक सुरक्षेसह पाचगणीवरून महाबळेश्वरला नेण्यात आलं आहे. वाधवान बंधूंच्या डीएचएफएलने येस बँक संकटात असतानाही ३,७०० कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआय याची चौकशी करत असतानाच ईडीनेही मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली आहे. 


'राज्य सरकारने सीबीआय आणि ईडीला वाधवान बंधूंची कोठडी घ्यायला सांगितलं आहे. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीमुळे वाधवान कुटुंबाला लॉकडाऊनमध्येही महाबळेश्वरला जायची परवानगी देण्यात आली. वाधवान कुटुंबाचा क्वारंटाईन कालावधी दुपारी २ वाजता संपत आहे. आम्ही ईडी आणि सीबीआयला पत्र लिहिलं आहे. सीबीआय कोठडी घेईपर्यंत वाधवान कुटुंब महाराष्ट्र पोलिसांच्या कस्टडीमध्ये असेल,' असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते.


गृहखात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला पाठवण्याची शिफारस करणारं पत्र दिलं होतं, यानंतर वाधवान कुटुंब महाबळेश्वरला गेलं. याप्रकरणावरुन वाद वाढल्यानंतर अमिताभ गुप्ता यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवलं.