पुण्यातील भिंतीवर साकारले मानाचे गणपती !
पुणे : गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडेच पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मनाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी लोक गर्दी करत आहेत.
पुणे : गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडेच पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मनाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी लोक गर्दी करत आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परंतु, तासंतास उभे राहून देखील अनेकांना बाप्पाचे दर्शन मिळत नाही. यासाठी पुण्यामध्ये एक वेगळी संकल्पना राबवली आली आहे.
पुण्यात यंदा गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे पुणे महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील मुख्य भागांमधील भितींवर गणरायाची विविधं रुपं साकारण्यात येत आहेत. सारसबागेजवळील बाबुराव सणस क्रीडा संकुलाच्या संरक्षक भिंतीवर पुण्यातील मानाच्या पहिल्या पाच गणपतींची आकर्षक चित्रं रंगविण्यात आली आहे. भितींवरील बाप्पाचे रूप बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
याठिकाणी मानाचा पहिला कसबा, दुसरा तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या गणपतींची सुंदर चित्रं रेखाटण्यात आलेली आहेत. पुणे महानगरपालिकेने एका खाजगी कंपनीला हे काम दिले असून भिंती रंगवण्यासाठी प्लॉस्टिक पेंटचा वापर करण्यात येत आहे. हे आकर्षक रंगकाम अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळे भाविकांचा उत्साह वाढलेला असून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.