दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडिअमच्या भाडे कराराच्या नुतनीकरणाची १२० कोटी रुपयांची रक्कम मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे थकीत असल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम वसुल करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला नोटीस बजावली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे असलेली १२० कोटी रुपयांची थकबाकी सरकार कधी वसुल करणार असा लेखी प्रश्न आज विधानसभेत विचारण्यात आला होता. त्याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महसूल विभागाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला वानखेडे स्टेडिअमसाठी भाडेपट्ट्याने जागा दिली आहे. या जागेचा भाडेकरार फेब्रुवारी २०१८ रोजी संपुष्टात आला आहे. या भाडेकराराचे नुतनीकरण करावे अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी भाडेकराराचे नुतनीकरण आणि थकीत कराची मिळून १२० कोटी १६ लाख रुपये रक्कम भरण्याची नोटीस मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठवली आहे. याबाबत मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तरात विधानसभेत दिली आहे.