रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे भाजपा समोर डोकेदुखी निर्माण झाली आहे. विद्यमान आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या विरोधात पक्षांतर्गत स्पर्धक निर्माण झाले आहे. प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांच्या पाठोपाठ आता माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांनी देखील भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन दिनकर तात्या यांनी मराठा कार्ड बाहेर काढत सांगलीत बहुजन समाजाचा आमदार का नसावा ? असा सवाल उपस्थित केला आहे. मी साडे पाच वर्ष भाजपात कोणत्याही पदाशिवाय चांगलं काम केलं आहे, मात्र चार महिन्यात सांगलीत वेगळं वातावरण निर्माण झालं आहे. 


सांगलीत बहुजन समाजाचा आमदार का नसावा ? म्हणून माझ्या सारख्या नेत्याने निवडणूक लढवावी असा, कार्यकर्त्यांचा माझ्यावर दबाव आहे. त्यामुळे भाजपाने माझ्या उमेदवारी बाबत योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा निर्णय माझ्या हातात राहणार नाही, असा इशारा माजी आमदार आणि भाजपा नेते दिनकर तात्या पाटील यांनी दिला आहे.