Wardha Loksabha Elections 2024 : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांचे मतदान 19 एप्रिलला पार पडले. तर शुक्रवारी 26 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान झाले. यंदा लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडी आणि महायुती असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या वर्धा मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारी वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षभरात प्रशासनाकडून गाजावाजा करत वर्ध्यात मतदार जनजागरण कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्याचाच परिणाम म्हणून वर्ध्यात मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 2019 ला झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी साडेतीन टक्क्याने वाढली आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाने आता अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे.


तृतीयपंथीयांनीही बजावला मतदानाचा हक्क


वर्धा लोकसभा मतदारसंघात 2014 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत 64 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर 2019 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत 61.18 टक्के मतदान झाले होते. यानंतर आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 64.85 टक्के इतके मतदान झाले आहे. वर्ध्यात एकूण 16 लाख 82 हजार 771 मतदारांपैकी 10 लाख 91 हजार 349 इतके मतदान झाले आहे. यात 5 लाख 86 हजार 780 पुरुष, तर 5 लाख 4 हजार 560 इतक्या महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 9 तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.


दरम्यान वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लाख 82 हजार 771 मतदार आहेत. यात 8 लाख 58 हजार 439 पुरुष, तर 8 लाख 24 हजार 318 महिला मतदारांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या 2024 या लोकसभा निवडणुकीत 10 लाख 91 हजार 349 मतदारांनी मतदान केले आहे. यात 5 लाख 86 हजार 780 पुरुष, तर 5 लाख 04 हजार 560 इतक्या महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदानाची एकूण टक्केवारी 64.85 टक्के इतकी आहे. 


विधानसभा निहाय झालेली मतांची टक्केवारी


  • धामणगाव विधानसभा क्षेत्र - 61.71 टक्के

  • मोर्शी विधानसभा क्षेत्र  - 65.01

  • वर्धा विधानसभा क्षेत्र - 62.53

  • आर्वी विधानसभा क्षेत्र - 68.98

  • देवळीं विधानसभा क्षेत्र - 65.61

  • हिंगणघाट विधानसभा क्षेत्र - 65.91


दरम्यान यंदा वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा एकदा रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमर काळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.