गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन लहान मुलांसह तीन जण बुडाले, वर्ध्यातली घटना
पाण्यात बुडत असलेल्या दोन लहान मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही बुडून मृत्यू
मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा : वर्ध्यातील मांडवा इथं गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तीन जणांचा बंधाऱ्यातील पाण्यता बुडून मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली. वर्ध्यात गावागावत गणपती विसर्जन केलं जात आहे. मांडवा गावातील काही तरुण गावाशेजारी असणाऱ्या मोती नाला बंधाऱ्यात गणपती विसर्जनासाठी गेले होते.
यावेळी दोन लहान मुलं बंधाऱ्याच्या पाण्यात पडली. त्यांना वाचवण्यासाठी संदीप चव्हाण नावाचा तरुण पाण्यात उतरला. दोन्ही मुलांनी त्याला मिठी मारली. संदीपने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पोहता येत नसल्याने त्याचा प्रयत्न अपुरा पडला. पाण्याच्या प्रवाहात तिघंही बुडाले. इथे उपस्थित असलेल्या इतर नागरिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढलं. पण दुर्देवाने दोन मुलांचा मृत्यू झाला होता. कार्तिक बलवीर (वय 12) आणि सचिन वंजारी (वय 14) अशी मृत मुलांची नावं आहेत.
संदीप चव्हाणला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, पण वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. या घटनेने मांडवा गावावर शोककळा पसरली आहे.