आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमुळे केडीएमसी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यातही समाधानाची बाब म्हणजे या व्यक्तीच्या 6 कुटुंबियांपैकी 5 जणांचे कोवीड रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचे रिपोर्ट येणं बाकी आहे. या संबंधित व्यक्तीचे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवले आहेत. याचा रिपोर्ट येण्यासाठी आठवडा लागणार असल्याची माहिती केडीएमसी साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. दरम्यान या कोरोनाबाधित व्यक्तीचा डोंबिवलीपर्यंतचा प्रवास कसा झाला, या दरम्यान तो कुठे कुठे फिरला, हे पाहणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा झाला या व्यक्तीचा प्रवास...


केपटाऊनमध्ये कोवीड रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला विमान प्रवासाची मुभा देण्यात आली. या डोंबिवलीकर प्रवाशाने केपटाऊन येथून दुबई, दुबईवरून दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान दिल्ली विमानतळावर त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. 



मात्र त्याचा अहवाल येईपर्यंत ही व्यक्ती मुंबईत दाखल झाली होती. त्याने मुंबईत आल्यावर खासगी कॅबद्वारे डोंबिवली गाठलं. मात्र दिल्लीत करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याबाबत त्याने आपल्या कुटुंबाला माहिती दिली. ज्यामुळे तो घरी येण्याआधीच ते सर्व जण नातेवाईकांकडे गेले होते.


डोंबिवलीत घरी परतल्यावर ताप आल्याने त्याच्या भावाने खासगी लॅबद्वारे पुन्हा एकदा त्याची कोवीड चाचणी करून घेतली. ज्यामध्ये त्याचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला. तर भावाची कोवीड चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे.


दरम्यान ही कोवीड चाचणी करण्यापूर्वी भावाने या खासगी लॅबला दक्षिण आफ्रिकेतून आलेली भावाबद्दल सांगितले. त्यावरून या खासगी लॅबचालकांनी केडीएमसी आरोग्य विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिल्याचे केडीएमसी अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.


दरम्यान दिल्लीला कोवीड चाचणी केल्यानंतर अहवाल येईपर्यंत या व्यक्तीला प्रवास करण्यापासून रोखले का नाही? दिल्ली मुंबईप्रवासादरम्यान ही व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली असेल त्याचे काय? ओमीक्रॉनबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात असतानाही झालेल्या हलगर्जीपणाला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न यानंतर निर्माण झाले आहेत.