....या आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला फायटर पायलट
भरारी घेण्यासाठी त्या सज्ज
नागपूर : हैदराबादमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये अंतरा मेहता यांची फायटर पायलट म्हणून निवड करण्यात आली. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी ते फायटर पायलट असा त्यांचा प्रवास फार सोपा नव्हता हेच खरं.
अंतरा यांनी गाठलेल्या यशशिखराचा त्यांच्या कुटुंबीयांना, विशेष म्हणजे पालकांना रास्त अभिमान आहे. आपल्या मुलीनं संपादन केलेल्या याच यशाविषयी सांगताना अंतरा यांचे वडील सांगतात, 'तिला आम्ही कधीही कोणत्याही गोष्टीसाठी अडवलं नाही. ती जसं हवं होतं तसं जगत होती, जे हवं ते करत होती. तुझी आहे ती इच्छा पूर्ण कर असंच आम्ही तिला सांगायचो. अखेर तिनं तिचं ध्येय्य गाठलं', असं म्हणत ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचं त्यांचे वडील म्हणाले.
सर्व मेहनत ही अंतरानेच केली, आम्ही फक्त तिला मदत केली या शब्दांत तिच्या आईनं आनंद व्यक्त केला. आपल्या मुलीनं इथवर पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं त्यांचे आई-वडील न विसरता सांगतात.
...असा आहे 'विरुष्का'चा मुंबईतील आशियाना
राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉलपटू असणाऱ्या अंतरा यांनी २०१८ मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. हैदराबादमध्ये एअरफोर्स अकॅडमीमध्ये त्यांनी वर्षभराचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं. यादरम्यान लढाऊ विमानांतून त्यांनी गगनभरारी घेतली. फायटर पायलट बनण्याचं त्यांचं स्वप्न हे किती महत्त्वाचं आहे, हे त्यांच्या खोलीच्या भींती पाहिल्यावर लगेचच लक्षात येतं. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वेगळ्या वाटांवर चालण्याची तयारी त्यांनी फार आधीपासूनच सुरु केली होती. याच बळावर त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक तरुण- तरुणींसाठी प्रेरणादायी असेल यात शंकाच नाही.