मुंबई : गडकिल्ल्यांच्या वाटांवर जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे असणाऱ्या माहुली किल्ल्याच्या आणखी एका दरवाजाचा शोध लागला आहे. या दरवाजाचा बराच भाग हा जमिनीखाली गाडला गेला असून, तोही बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आता याविषयीची रंजक माहिती समोर येण्याची चिन्हं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय कठीण चढ असणाऱ्या गड किल्ल्यांपैकी एक अशा मानल्या जाणाऱ्या किल्ले माहुली येथील चौथ्या दरवाजाचा शोध लावण्यात आला आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या काही दुर्गप्रेमींनी हा शोध लावला आहे. आतापर्यंत या किल्ल्याचे महादरवाजा, कल्याण दरवाजा आणि हनुमान दरवाजा असे एकूण तीन दरवाजे सर्वज्ञात होते. त्यातच भर म्हणून गिरीप्रेमींनी चौथ्याही दरवाजाचा शोध लावला आहे. 


पळस गडावरच्या खोर मार्गे येणाऱ्या घळईतून चढाई केल्यावर हा चौथा दरवाजा लागतो. ज्याच्या घळीच्या दोन्ही बाजूच्या कातळात तटबंदी आणि अर्थवर्तुळाकारात दगडी तुटलेली कमान आहे. या कमानीत तीस फूट उंच नृत्य प्रकारात गणपती शिल्प कोरलं आहे. तर कमानीच्या वरील बाजूस म्हणजेच पळस गडाच्या दिशेला मातीने बुजलेल्या आठ पायऱ्या आहेत. 


 



पायऱ्यांच्या थोडं वर गेल्याच जात्याचा अर्धा भाग पडलेला आढळतो. या कमानीचा बराच भाग हा जमिनीखाली असल्याची माहिती दुर्गप्रेमींनी दिली आहे. मातीच्या ढिकाऱ्याखाली गाडला गेलेला हा दरवाजा आतापर्यंत अज्ञात होता. अनेक शतकांपासून या मार्गाने कोणी न आल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. येत्या काळात मातीतील प्रवेशद्वाराचा भाग मोकळा केला जाणार आहे. त्यामुळे इतिहासाच्या आणखीही काही खाणाखुणा सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.