अनेक रहिवासी इमारती आणि कंपन्या सुरक्षेसाठी वॉचमन नेमतात. नेमणुकीआधी  त्यांच्याकडून पोलीस पडताळणी प्रमाणपत्र घेतात. मात्र अशी प्रमाणपत्रच बनावट बनवून देणारं एक रॅकेट पिंपरी चिंचवडमध्ये उघड झालं आहे. यामुळं राज्यातल्या हजारो उद्योजकांची धाकधूक वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहिवासी इमारती, विविध कंपन्या, मॉल्सची सुरक्षा वॉचमनच्या खांद्यावर असते. पण याच सुरक्षा रक्षकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असली तर?. कारण बनावट चारित्र्य प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी सुरक्षा रक्षकांची नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलाय. सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीआधी त्यांच्यावर कुठले गुन्हे नोंद नाहीत ना याची खात्री म्हणून पोलीस पडताळणी प्रमाणपत्र घेतलं जातं. मात्र यातच फसवाफसवी झालीय. काही सुरक्षारक्षक आणि वाहन चालकांनी बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र मिळवत कंपन्या आणि रहिवासी संकुलांमध्ये वॉचमनचं काम मिळवलंय. दिघी परिसरात अशा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय आणि टोळीतील चौघांना दहशतवाद विरोधी पथकानं जेरबंद केलं आहे.


पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. या टोळीकडून बाराशे ते सोळाशे रुपयांना बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र बनवून दिले जात होते. त्यांनी पिंपरी आणि पुण्यात 41 कामगारांना अशा पद्धतीने पोलीस पडताळणी प्रमाणपत्र दिल्याचे स्पष्ट झाले आहे.


पिंपरी चिंचवडमध्ये लहान मोठ्या अशा 15 हजार कंपन्या आहेत. इथल्या लाखो कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शेकडो सुरक्षारक म्हणजेच वॉचमनना नेमलं जातं.  हा प्रकार समोर आल्यावर आता उद्योजकांनीही चिंता व्यक्त केलीय. 
 
खरंतर रहिवासी सोसायट्या आणि खासगी कंपनीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा रक्षक नेमले जातात.. मात्र हेच सुरक्षारक्षक जर भ्रष्ट आणि खोट्या पोलीस पडताळणी प्रमाणपत्रानं नोकरी मिळवत असतील तर त्या सोसायटी आणि कंपनीची सुरक्षा रामभरोसेच म्हणावी लागेल.