दीड तासाच्या मुसळधार पावसाने नाशिकच्या व्यवस्थेची दैना
मुसळधार पावसानं महापालिकेचा भ्रष्ट कारभार उघडा पाडला.
योगेश खरे, नाशिक : दीड तास झालेल्या मुसळधार पावसानं नाशिक शहरातल्या व्यवस्थेची दैना केली आणि महापालिकेचा भ्रष्ट कारभार उघडा पाडला. चारशे कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेली पावसाळी गटार योजना राबवली आहे की नाही असा प्रश्नच यातून निर्माण झाला आहे. काहीही असो यामुळे नाशिककरांचे मात्र पुरतेच हाल झाले.
नाशिक महापालिकेचं मुख्यालय असलेल्या शरणपूर रोडवरचं सुमारे अर्धा फूट इतकं पाणी साचल्याचं हे भयानक चित्र आहे. शहराचा कारभार चालवणाऱ्या पालिका मुख्यालयाची ही दयनीय अवस्था असेल, तर शहराचा विचार न केलेलेचा बरा. अनेक संकुलातले तळमजले पाण्यात बुडाल्यानं, तळमजल्यांवरच्या दुकानदारांचे पुरते हाल झाले. तर अनेक ठिकाणी पाण्याचा तलाव साचून, रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
अवघ्या दीड तासाच्या पावसानं शहर जलमय झालं. त्यातच आठवडी बाजार असल्यामुळे गोदाकाठावरच्या विक्रेत्यांसह नागरिकांना मोठा फटका बसला. गटारं तसंच नाल्याचं सांडपाणी मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्यानं, बाजारात दुर्गंधीयुक्त पाणी पसरलं. नागरिकांनी महापालिकेच्या निष्क्रीय कारभारावर सडकून टीका केली आहे.
दरम्यान महापलिका कोट्यवधी रुपये सांडपाण्यावर खर्च करते. मात्र पावसाचं प्रमाण खूप जास्त असल्यानं आणि प्लास्टिक पिशव्या गटारात अडकल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याची सारवासारव यावर महापौरांनी केली. पावसाळ्या पूर्वी दिलेल्या मुदतीत नालेसफाईची कामं पूर्ण न झाल्यानं, नाशिक शहरावर ही परिस्थिती ओढवली. निदान आता तरी पालिकेच्या कारभाऱ्यांनी याकडे गंभिरतेने लक्ष देण्याची गरज आहे.