Mumbai Water Shortage : यंदाच्या वर्षी कमी पर्जन्यमानामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या साठ्यातून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेने केली होती. मुंबईच्या पाण्याचा तुटवडा निभावणी साठ्यातून उपलब्ध करून देण्याची हमी राज्य सरकारकडून मिळाल्यानेच पाणीपुरवठ्यातील प्रस्तावित १० टक्के कपात करण्यात येणार नाही, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वीच्या दोन वर्षात १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यात सक्रिय होता. मात्र यंदाच्या पावसाळ्यात ऑक्टोबर २०२३ मध्ये पाऊस झाला नाही. त्यामुळे गेल्यावेळीच्या तुलनेत सद्यस्थितीला धरणसाठ्यामध्ये ५.५८ टक्के पाणी साठा कमी आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये एकूण साठ्याच्या ४२.६७ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळेच नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्याबाबतचा अंदाज पाहता तसेच मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता पाहता १० टक्के पाणी कपातीचा निर्णय मुंबई महानगरपालिकेमार्फत घेण्यात आला होता.


मात्र, राज्य शासनाकडून मिळालेल्या हमीमुळेच कोणत्याही प्रकारची पाणीकपात करण्यात येणार नाही.  नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.