बुलढाण्यात जलपातळी खालावली; अनेक गावांत भीषण पाणी टंचाई
स्थानिक प्रशासनाने १९९ गावांमध्ये २०६ टँकर सुरू केले आहेत.
मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : अजिंठ्याच्या पर्वतरांगेत वसलेले बुलढाणा शहर आता उष्णतेच्या झळा सोसत आहेत. त्याचे कारण म्हणजे अवैधरित्या केली गेलेली वृक्षतोड आणि कोणतेही नियोजन नसल्याने खालावलेली जलपातळी. मराठवाडानंतर पश्चिम विदर्भातील बुलढाणा हे आता दुष्काळाकडे वळू लागले आहे. या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून पाण्याची टंचाई सुरूच आहे.
शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद देऊळगाव राजा या तालुक्यात तर ही टंचाई अत्यंत भीषण स्वरूपाची आहे. स्थानिक प्रशासनाने १९९ गावांमध्ये २०६ टँकर सुरू केले आहेत. पण बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत की जिथे बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. बाब इतकी गंभीर आहे की त्या गावांमध्ये साधी नळयोजना सुद्धा नाही. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. दळणवळणाच्या सुविधा आहेत मात्र, जीवन जगण्यासाठी महत्त्वाचा भाग असणारे पाणीच नाही. जलव्यवस्थापनाची कोणतीही प्रभावी कामे जिल्ह्यात केली गेली नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील भूगर्भ जलपातळी खूप खालावली आहे. विहिरी, कूपनलिका तसेच तलाव सर्वकाही कोरडे पडले आहेत आणि परिस्थिती अशीच राहिली तर बुलढाणा जिल्ह्याचे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.
पाण्याचा व्यवस्थित वापर आणि त्याचे नियोजन, त्याची साठवण भविष्यात आपल्याला महत्त्वाची ठरेल. यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील असले पाहिजे. खडकपूर्णा पेनटाकळी त्यानंतर पैनगंगा नदीवर बांधलेले येळगाव धरण ही बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी तीन धरण आहेत. यावर्षीचा जर विचार केला तर केवळ काही दिवसच पुरेल इतकाच जलसाठा या धरणांमध्ये आहे. वाढते तापमान आणि या वाढत्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन यामुळेही भरपूर पाणी कमी होत चालले आहे आणि परिणामी धरणांतील पाणी आटते आहे.
एकेकाळी बुलढाणा म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जायचे. इंग्रजांनी सुद्धा बुलढाण्यात आपली वसाहत तयार केली होती आणि त्या काळातील इमारती आजही शाबूत आहेत. त्या इमारतींनी गेल्या दीडशे वर्षांचा बुलढाण्याचा इतिहास पाहिला आहे आणि आज त्यांना प्रश्न पडला असेल की एकेकाळी थंडगार असणारा भिल्लठाणा आज बुलढाणा तर झालंय आणि वेळेनुसार बदललेल्या नावाप्रमाणे बुलढाण्याच्या तापमानातही तितकाच फरक पडलाय....!