COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापुरात पुराचं पाणी ओसरल्यानंतर जनावरं, शेळ्या, मेंढ्या आणि इतर प्राण्यांच्या मृतदेहांचे खच आढळून येत आहेत. सांगली जिल्ह्यातल्या सुकवाडी गावातही असंच चित्र आहे. या गावात ५०-६० गायी आणि बैलांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय. आता पाणी ओसरल्यानंतर या जनावरांच्या मृतदेहाचा खच पडलाय. आता या मृतदेहांची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. यामुळे आता साथीचे रोग परसण्याची भीती आता पूरग्रस्तांमध्ये आहे. त्यामुळे या गावातल्या पूरग्रस्तानं या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला तातडीनं पावलं उचलण्याचं आवाहन केलंय.


कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती हळू हळू ओसरत आहे. पूरपरिस्थिती ओसरत असल्यामुळे पुणे-बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला. आठ दिवस हा महामार्ग बंद होता. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांचे खूप हाल झालेत.  कोल्हापूरच्या शिरोळ भागातील हसूर या गावाशी अजूनही रस्त्याद्वारे संपर्क होवू शकत नसल्यानं बोटींच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू पोहचवल्या जातायत. तसंच जनावरांसाठी पशुखाद्य आणि चाराही बोटीतून नेला जातोय. पुरानं हाहाकार उडवल्यानं अनेकांचे संसार या गावात उद्धवस्त झालेत. आता पूर ओसरला असला तरी अनेक घरे पाण्याखाली आहेत. घरात वर्षभराची केलेली धान्याची बेगमी, सर्व सांसारीक वस्तू महापुरात वाहून गेल्या आहेत. गावातील असा कुठला उंबरठा उरला नाही की जिथं पुराचे पाणी आलेले नाही.



२४ तासांत मुसळधार 


येत्या २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये. कोल्हापूर सातारा आणि पुणे भागात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.  मुंबईत मात्र मध्यमस्वरूपाचा पाऊस राहील. मराठवाड्यातही मध्यमस्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.