शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : परतीच्या पावसाचा फटका राज्यातील अनेक भागांना बसला असला तरी, या परतीच्या पावसाचा फायदा लातूरकरांना झाल्याचं चित्र आहे. कारण गेल्या १०-१२ दिवसांत लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात सध्या ३७.७३ एमएमक्युब इतका पाणीसाठा जमा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१०-१२ दिवसांपूर्वी धरणात अवघा ०३.३७ एमएमक्युब इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून लातूर शहराचा पाणी पुरवठा बंद होणार होता. तर लातूरला टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येणार होती. मात्र मांजरा धरणातील पाणलोट क्षेत्रीय परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणी साठा ०३.३७ एमएमक्युब वरुन ३७.७३ एमएमक्युब इतका झाला आहे. 


आता लातूर शहराला १५ दिवसांतून एकदा याप्रमाणे पुढील जुलै-ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे. 


  


लातूर शहाराशिवाय बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब ही शहरे आणि परिसरातील अनेज गावं ही मांजरा धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळं धरणातील पाणी आता पुढील वर्षापर्यंत जपून वापरण्याचा सल्ला लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिला आहे. 


पाणी बचतीसाठी नागरिकांनी उन्हाळा उजाडण्याची किंवा धरण कोरडं पडण्याची वाट पाहू नये असा सल्ला त्यांनी दिला आहे.