चोपडा पालिकेवर नागरिकांचा जोरदार हल्लाबोल, सभागृहात घुसत घेराव
चोपडा नगरपालिकेवर शहरातील नागरिकांनी पाणीप्रश्नी हल्लाबोल केला.
जळगाव : भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच काँग्रेस युती मिळून सत्ता असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा नगरपालिकेवर शहरातील नागरिकांनी पाणीप्रश्नी हल्लाबोल केला. चोपडा शहराला पाणीपुरवठा करणारे गुळपाणी धरण ८५ टक्के भरून सुध्दा शहराला १५ दिवसापासून पाणीपुरवठा झालेला नाही, वीज दिवे लावले जात नाही. गटार साफ केले जात नाही, त्यामुळं संतापलेल्या महिलांनी चोपडा नगरपालिकेवर मोर्चा काढला.
यावेळी नागरिकांनी नगराध्यक्षां मनीषा चौधरी यांना घेराव घालून त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दालनातील खुर्च्या फेकून, काचा तसंच पाण्याच्या घागरी फोडून प्रशासनाला जाब विचारला, पालिकेच्या सर्वसाधारण घुसून सुमारे २ तास पालिका सभागृहात नागरिकांनी सत्ताधारी तसंच प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या महिनाभरात चोपडा नगरपालिकेवर पाणीप्रश्नी नागरिकांनी दुसऱ्यांदा मोर्चा काढलाय.