Mumbai News: मुंबईसह राज्यात पावसाने जोर धरला आहे. धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 14 जुलै रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सात धरणांमधील पाणीसाठा 29.73 टक्क्यांवर पोहोचला होता. 30 जून  रोजी पाणीसाठ्यात घट होऊन 5.43 टक्के इतका होता. मात्र गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असल्याने जलाशयामधील पाणीसाठ्यात 25 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. त्यामुळं मुंबई महानगर पालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. जलाशयांमध्ये 14 जुलै रोजी 4,30,259 एलएमडी म्हणजेच 29.73 टक्के पाणी जमा झाले होते. पाणीसाठ्यात झालेली वाढ ही 2023च्या तुलनेने चांगली आहे. मागील वर्षी याचकाळात जलाशयात 4,30,096 एलएलडी म्हणजेच 29.72 टक्के इतका पाणीसाठा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत जलाशयातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरीही हा पाणीसाठा मुबलक नाहीये. त्यामुळं पालिका प्रशासनाकडून पाणी कपात अद्याप मागे घेण्यात येणार नाहीये. त्यामुळं मुंबईकरांना अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. 


मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या जलाशयातून दररोज 3,850 एमएलडी पाणी सोडले जाते. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अप्पर वैतरणामध्ये ४ हजार ३१९ एमएलडी म्हणजेच १.९० टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. 30 जूनपर्यंत भातसा येथील पाणीसाठाही शून्य होता, तो आता 2,05,765 MLD म्हणजेच तलावाच्या एकूण क्षमतेच्या 28.70 टक्के इतका झाला आहे.


बीएमसीच्या आकडेवारीनुसार, तानसा, मोडक सागरसह तुळशी आणि विहार तलावांमध्ये सर्वाधिक साठा आहे. मोडक सागर तलावात 58,937 एमएलडी म्हणजेच 45.71 टक्के पाणीसाठा झाला असून तानसा तलावात 88,276 एमएलडी म्हणजेच 60.85 टक्के पाणीसाठा झाला आहे. मध्य वैतरणा येथील पाण्याची पातळी 52,380 एमएलडी म्हणजेच 27.07 टक्के झाली आहे. विहार तलावात 14,424 एमएलडी पाणीसाठा जमा झाला आहे. जे त्याच्या एकूण क्षमतेच्या 52.08 टक्के आहे. तुळशी तलावात 6,158 एमएलडी म्हणजेच एकूण क्षमतेच्या 76.54 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 


बीएमसीच्या हायड्रॉलिक विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये चांगला पाऊस झाला नाही, त्यामुळे तलावांच्या पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत सात तलावांमध्ये 14,47,363 एमएलडी पाणीसाठा जमा होईल, अशी आशा आहे. मात्र पाणीसाठ्यात वाढ जरी झाली असली तरी मुंबईकरांवरांना आणखी काही वेळ पाणी कपातीची कळ सोसावी लागणार आहे.