टँकर माफियांकडून होतोय डबक्यातल्या पाण्याचा पुरवठा
वसईतले टँकर माफिया लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. पाहुयात `झी 24 तास`च्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा सगळा धक्कादायक प्रकार...
प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई : वसईतले टँकर माफिया लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. पाहुयात 'झी 24 तास'च्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा सगळा धक्कादायक प्रकार...
वसई पूर्वेकडच्या राजावली परिसरातल्या डोंगरांच्यामध्ये खदानीचं एक डबकं आहे. इथे राजरोस गोरखधंदा सुरू आहे... हा गोरखधंदा आहे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्याचा... या डबक्यात मोटर लावून पाणी काढलं जातंय आणि ते टँकरमध्ये भरलं जातंय... याच पाण्यात कुत्रे, गायी म्हशी आंघोळ करतात... कदाचित सांडपाणीही मिसळतं... आणि हेच सगळं पाणी भरुन जनतेला पाणीपुरवठा करणारा टँकर रवाना होतो.
आम्ही या टँकरचा पाठलाग केला... हा टँकर एव्हरशाईनमार्गे नालासोपाऱ्यातल्या 'साईसिद्धांत' इमारतीत पोहोचला... तिथे या टँकरमधलं पाणी इमारतीच्या टाकीत सोडण्यात आलं... इथले सगळे रहिवासी हेच पाणी सुरक्षित समजून पितायत... वसई, विरार, नालासोपाऱ्यातल्या अनेक इमारतींना असं पाणी पुरवलं जातंय. खदानीतल्या डबक्यातलं हे पाणी प्यायल्यानं त्वचेचे आणि इतरही रोग होतात.
टँकरच्या या असल्या गोरखधंद्याचा 'झी 24 तास'नं आधीही पर्दाफाश केला होता. त्यावेळी काही टँकर जप्त करण्यात आले होते. महापालिका आणि महसूल खात्याला आता पुन्हा झोप लागलीय. त्यामुळे टँकर माफिया सक्रिय होऊन त्यांच्या तुमड्या भरतायत... पण वसई विरार भागातल्या रहिवाशांच्या जीवाशी मात्र अक्षरशः खेळ सुरू आहे.