Sangli : सांगलीच्या जत तालुक्यातील 42 गावांनी कर्नाटकात जाण्याच्या प्रस्तावाचा दाखला देत कर्नाटकच्या मुख्यमत्र्यांनी (basavaraj bommai) या गावांना कर्नाटकात सामावून घेण्याबाबत गंभीर आहोत असे म्हटल्यानंतर नवा वाद सुरु आहे. या वादामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा पेटला आहे. पाणी प्रश्नावरुन जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी तयार केला होता. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत भाष्य केल्यानंतर जतमधील गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ या गावांना पाणी पुरवठा करण्याच्या योजनेबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जतमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. मात्र यावेळी गावकऱ्यांनीच उदय सामंत यांना इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योगमंत्री उदय सामंत सोमवारी सांगलीच्या जत तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. पाणी टंचाईची झळ सोसणाऱ्या गावांची उदय सामंत यांनी पाहणी केली. यावेळी चर्चा करत असताना योजना पूर्ण करा नाही तर आम्ही कर्नाटकास जाण्यास तयार आहोत, असे गावकऱ्यांनी म्हटले.


हे ही वाचा >> बेळगाव दौरा रद्द झाल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण


आम्ही कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक 


"पिण्यासाठी पाणी मागितलं तरी लवकर टॅंकर मिळत नाही. शेतीचे तर सोडाचं. ही वस्तुस्थिती असल्याने आमची 50 गावे कर्नाटकात जाण्यास तयार आहेत. आतासुद्धा आम्ही कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहोत. आम्ही तुम्हाला विनंती करतोय जर योजना पूर्ण केल्या तर आम्ही राहू. नाहीतर आमच्यावर कोणताही बंधने नाहीत. आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्या. आम्ही जाण्यास तयार आहोत," असे ग्रामस्थाने म्हटले आहे.


दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता शंभूराज देसाई यांनी दौऱ्याबाबत भूमिका स्पष्ट केली. "दौराबाबत निश्चित निर्णय अद्याप झालेला नाही. स्थानिक लोकांनी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमच्या जाण्याच्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील," असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.