Maharashtra Weather Update: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसाने राज्यात धुमाकुळ घातला होता. आता मात्र, पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मुंबईतही पावसाचा जोर कमी झाला असून सोमवारी दिवसभर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तर, मध्यरात्री मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस बरसला आहे. मात्र, आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमीच राहणार आहे. एक दोन जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आलेला नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली आहे. 29 ते 2 ऑगस्टपर्यंत मुंबई, ठाणे, पालघरला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात व घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा व विदर्भात मात्र ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. 


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्टपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रात 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि गोवापरिसरातही मुसळधार पाऊस बरसू शकतो. विदर्भातही 1 आणि 2 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस बरसू शकतो. 


भंडाऱ्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे लाखोचे नुकसान


भंडारा जिल्ह्यात संततधार पाऊस बरसला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या बागायतीचे लाखोचे नुकसान झालेले आहे.सदर शेतकरी शरद गीदमारे व दिनेश गिदमारे यांची भंडारा जवळील पलाडी गावात सहा एकर बागायती शेती असून शेतामधे काकडी,कारले,गलगले,मिरची,टरबूज यांची लागवट केली होती. मात्र दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने त्यांच्या शेतात अतिवृष्टी मुळे पाणी गेल्याने 10,ते 12 लाखाचे नुकसान झाले.


कोल्हापूर जिल्ह्यातील 45 हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली


कोल्हापूर जिल्ह्यातील 45 हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली गेली आहे. गेले आठ दिवस एकसारखा पाऊस कोसळत असल्याने नद्यांचे पाणी पात्र बाहेर पडून नदीकाठावरील ऊस आणि भात पिके पाण्याखाली गेली आहेत. ऊस पिक पाण्याखाली गेल्याने उसाच्या शेंडात पाणी आणि माती गेल्याने ऊस कुजण्याची प्रक्रिया वेगाने होणार आहे. याचा सर्वाधिक नुकसान शिरोळ हातकलंगले आणि करवीर तालुक्याला बसणार आहे.