Maharashtra Weather News : मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झालेला असतानाच आता राज्यासह देशातील बहुतांश भागांमध्ये तापमानाचा आकडा काही अंशांनी घटताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी भागात मात्र हवेतील आर्द्रतेचं प्रमाण कमी झालं नसल्यामुळं नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. त्यातच हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासात पुन्हा एकदा हवामान बदलांची नोंद केली जाणार असून, यावेळी बहुतांश भागांना पावसाचा तडाखा बसताना दिसू शकतो, ज्यामुळं बळीराजालाही पावसाची मर्जी कळेनाशी झालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये 31 मे पर्यंत पावसाचा तडाखा बसेल. तर बहुतांश भागांमध्ये उकाड्याचं प्रमाणही कमी होईल. सध्याच्या घडीला मान्सूनची वाटचालही सकारात्मक मार्गानं सुरु असल्यामुळं त्याच्या वाटेत कोणताही अडथळा न आल्यासस बंगालच्या उपसागरातून तो चांगल्या वेगानं पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


देशातील राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सध्या चक्रवातसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रावरही त्याचे काही अंशी परिणाम पाहायला मिळणार आहेत. 



वादळी वारे, पाऊस आणि बरंच काही...


एकिकडे हवामान विभागाकडून देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा तडाखा बसणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये गारपीटीची शक्यता आहे. तर, उत्तराखंडमध्ये तुफानी वारे नुकसान करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


हेसुद्धा वाचा : माणुस असावा तर असा! रिक्षात खडी आणि डांबर भरून बुजवतोय खड्डे


 


देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या भागांमध्ये पुढल्या पाच दिवसांपर्यंत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, तामिनाडूमध्ये 31 मे, 1 जून दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 जूनपासून देशात मान्सून सक्रिय होणार असल्याचा प्राथमिक अंदाज असून, 7 जूनपर्यंत तो महाराष्ट्रापर्यंत येण्याचीही प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे.