Weather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी
Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. अगदी हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांचा एकच गोंधळ उडाला. या सगळ्याचा परिणाम शेतावर झाल्याने शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली. मात्र आता अवकाळी पाऊस आणि थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कोकण वगळता उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १८ अंशांच्या खाली आले आहे. आज तापमानात २ ते ३ अंशांची घट होणार असल्याने गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १४ ते २२ अंशांच्या दरम्यान आहे. राज्यात किमान तापमानात हळूहळू घट होत थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
थंडी वाढणार
भारतीय हवामान खात्याने थंड वातावरणात उत्तर भारतात दाट धुक्याचा इशारा दिला आहे. आज आकाश निरभ्र असेल. सकाळी हलके धुके असेल. दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण असेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारतात थंडीचे दिवस आणि कडक थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. पुढील चार ते पाच दिवस सकाळी आणि रात्री दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. शनिवारी हरियाणाच्या नर्नूल, दिल्ली येथील अयानगर आणि उत्तर प्रदेशातील कानपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे ३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान तापमानात काहीशी घट होईल. तसेच आकाश काही प्रमाणात निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात पश्चिमी प्रकोपानंतर उत्तरेकडून वारे वाहू लागले तर पुन्हा गारवा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.