Maharashtra Weather Update: ऑक्टोबर महिना सरत आला तरी अद्याप थंडीची चाहूल लागली नाहीये. ऑक्टोबर हिटचा तडाखा अजूनही जाणवतो आहे. मुंबई तसेच कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा सातत्याने चढा आहेच. पुढचे काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहिलं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, पुढील पाच दिवस मुंबईकरांना उष्ण हवामानापासून दिलासा नाहीच, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, दोन दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तर, इतर ठिकाणी मात्र हवामान कोरडे राहणार आहे. पण कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. मुंबई आणि कोकणाच्या तुलनेत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान कमी आहे. 


कोकण आणि मुंबईत उच्च दाबाचे हवेचे क्षेत्र आहे. त्यामुळं हवेत उष्णता आहे. ही हवा एकवटलेली असल्याने मुंबईचे कमाल तापमान सातत्याने चढे आहे. त्याचबरोबर, गुजरातवर प्रत्यावर्तीय चक्रवात स्थिती निर्माण झाल्याने समुद्रावरुन हवा घेऊन आलेले वारे मध्य भारताजवळ आदळतात त्यातच कोरड्या वाऱ्यांची भर पडते, असंही हवामान विभागाने सांगितले आहे. 



मुंबईत सोमवारी 36.8 अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान वाढले आहे. तर, 5 नोव्हेंबरपर्यंत तापमान असेच चढे राहणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आकाश कोरडे असल्याने अधिक उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंतही थंडीची चाहूल नसल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्याचबरोबर, प्रदूषणामुळं अनेक आजारांनी थैमान घातले आहे. 


राज्यात गेल्या आठवड्याभरापासून इतर ठिकाणी किमान तापमान उतरले आहे. मात्र थंडीची जाणीव मात्र होताना दिसत नाहीये. सकाळच्या वेळेस वातावरणात थोडा गारवा जाणवतो पण नंतर दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागतात. कोकण विभागात बहुतांश केंद्रांवर कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे नोंदले जात आहे. सोमवारी सांताक्रूझ येथे रविवारपेक्षा ०.४ अंशांनी कमाल तापमान वाढले. कुलाबा येथे सोमवारी ३५.२, डहाणू येथे ३५.८ तर रत्नागिरी येथेही ३६.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.


दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवार आणि मंगळवारी दोन दिवस सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. तर 5 नोव्हेंबरपर्यंत हवामान कोरडे राहणार असल्याचे म्हटलं होतं.