`या` भागात तापमान 1 अंशांवर, विदर्भात अवकाळीची शक्यता; उर्वरित राज्यात हवामानाची काय परिस्थिती?
Weather Update : राज्यातील हवामानात आता पुन्हा बदल संभवत असून, विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, कुठं तापमान चक्क 1 अंशांवर आलं आहे.
Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पुन्हा थैमान घालणार आहे. तर, काही भागांमध्ये मात्र थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather Update )
विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसह अमरावतीमध्ये अवकाळीच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच सध्या चक्राकार वारेही सक्रिय असल्यामुळं राज्यात शीतलहरींचा प्रभावही दिसून येणार आहे. मुंबई, पुण्यासह, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरपर्यंत तापमानात घट नोंदवली जाईल. पुण्यातील डोंगराळ भागांमध्ये वातावरण ढगाळ राहील, तर साताऱ्याच्या डोंगररांगांवरही ढगांचं सावट काही काळासाठी पावसाबाबतच्या चिंतेत भर टाकताना दिसेल.
सध्याच्या घडीला कोकणाचा उत्तर भाग आणि नजीकच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्यामुळं कर्नाटकापासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा विरळ पट्टा सक्रीय आहे. ज्यामुळं अवकाळीची हजेरी विदर्भात पाहायला मिळू शकते. उर्वरित राज्यात थंडीचा कडाका वाढताना दिसेल, तर निच्चांकी तापमान 8 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
'इथं' तापमान 1 अंशांवर...
देशाच्या उत्तरेकडे सध्या थंडीची लाट आणखी तीव्र झाली असून, मध्य प्रदेश आणि राजस्थानातही याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. सध्या (Rajasthan) राजस्थानात हवामान कोरडं असून, येथील फतेहपूर भागामध्ये तापमान 1.6 अंशांवर, तर अलवर येथे तापमान 2.8 अंशांवर पोहोचलं आहे.
स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेला असणाऱ्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग येथे धुक्याचं प्रमाण जास्त राहणार असून, दुपारनंतर थंडीचा कडाका वाढू लागणार आहे. तर, उत्तराखंड आणि काश्मीरच्या खोऱ्यात तापमानातील घट जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. त्यामुळं या थंडीला अनुसरूनच दिनक्रम आखावा असंही स्थानिकांना सांगण्यात येत आहे.
हेसुद्धा वाचा : Maratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या
दरम्यान, अवकाळीचा तडाखा फक्त महाराष्ट्राच्या विदर्भालाच बसणार नसून, आंध्रचा किनारी भाग, केरळ, लक्षद्वीप आणि सिक्कीममध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिसा आणि छत्तीसगढलाही अवकाळीचा तडाखा बसू शकतो असं सांगण्यात येत आहे.