राज्यात 5 एप्रिलपासून पुढील 4 दिवस मेघगर्जनेचा इशारा; तापमानातही वाढ
IMD : राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. अशात हवामान खात्याच्या माहितीनुसार आठवड्याच्या शेवटी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
IMD Weather Forecast : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एका ठिकाणी उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होशाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये महाराष्ट्रात 5 एप्रिलपासून पुढील 4 दिवस मेघगर्जनेचा इशारा दिला आहे.
एवढंच नव्हे तर या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे. शुक्रवारपासून हवेत आद्रता वाढलेली पाहायला मिळणार आहे. पाच ते आठ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात असं वातावरण असेल. तर सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात अक्षरशः सूर्य आग ओकत आहे. आतापर्यंत तापमानाची नोंद ही 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत नोंदवली आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट येण्याचा देखील इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही जिल्ह्यात पारा हा 40 पार गेला आहे. अशातच हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये पाऊस पडणार आहे.
मुंबईत हवामान खात्याने पुढील 24 तासांत कसे तापमान असेल, हे वर्तवले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा अंदाज पाहता हवामान कोरडे राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. एवढंच नव्हे तर शहर आणि उपनगरात निरभ्र आकाश पाहायला मिळेल. मुंबईसह उपनगरात कमाल 34°C आणि किमान तापमान 23°C च्या आसपास राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. अशा वातावरणात 5 एप्रिलपासून पावसाला सुरुवात होणार आहे.