नव्या आठवड्याची सुरुवातही पावसानेच; राज्यातील `या` भागांमध्ये कोसळधार
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर, शेतकरी चिंतातूर झाला आहे.
Maharashtra Weather News : शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि रविवारपर्यंत या पावसानं मुंबई, पालघर, ठाण्यालाही ओलंचिंब केलं. असा हा पाऊस पुढील दोन दिवस तरी पाठलाग सोडणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पालघर भागामध्ये सोमवारी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस बरसेल. तर, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळेल. राज्याच्या किनारपट्टी भागातून हा पाऊस पुढे सरकणार असून, आता हिवाळ्यातही पावसाळाच अनुभवावा लागणार आहे. दरम्यान, राज्यातील तापमानात काही अंशांची घट नोंदवण्यात येणार असून, कमाल तापमान सरासरी 33 अंशांच्या घरात राहील.
इथं कोसळधार...
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळणार असून, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी पालघर जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. याच धर्तीवर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तिथे मुंबईसोबतच रायगडमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. रायगडच्या अलिबाग, कर्जत, खालापूर, खोपोली, माथेरान मध्ये ही ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी लावली होती. या अवकाळीमुळं भात पिकाचं नुकसान होण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरासह वाशिम तालुक्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मध्यरात्रीपासून काही ठिकाणी जोरदार तर काही भागात अद्यापही रिमझिम पाऊस सुरुच आहे.
हेसुद्धा वाचा : ALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा
आयएमडीच्या माहितीनुसार तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, 27 आणि 28 नोव्हेंबरला विदर्भात मुसधार पावसाची शक्यता आहे. याचदरम्यान मध्य प्रदेशातील दक्षिण पश्चिम भागातही पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तराखंड, राजस्थानचा दक्षिण भाग इथं गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांच्या पर्वतील भागांमध्ये कडाक्याची थंडी पडणार असून, या शीतलहरी मैदानी क्षेत्रापर्यंत वाहत येणार असल्यामुळं किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.