ALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा

China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची?   

सायली पाटील | Updated: Nov 27, 2023, 08:43 AM IST
ALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा  title=
प्रतिकात्मक छायाचित्र / china mysterious pneumonia outbreak Maharashtra state government on alert

China News Virus : 2019 च्या अखेरीस चीनच्या वुहान शहरातून कोरोनाच्या विषाणूनं जगभरात दहशत माजवली आणि हाहाकार पाहायला मिळाला. संपूर्ण जगाला मोठ्या संकटात लोटणाऱ्या या विषाणूची दहशत संपून जग सुटकेचा नि:श्वास टाकत नाही, तोच पुन्हा एकदा एका आजारानं चीनमध्ये हातपाय पसरल्याचं पाहायला मिळत आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनंही या गोष्टीची दखल घेतली असून, संपूर्ण जगभरातील देशांना सतर्क केलं आहे. (Mystery Pneumonia) रहस्यमयी न्यूमोनिया असं या संसर्गाचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. 

तिथं चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियाचा फैलाव झाल्यामुळं इथं भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना आरोग्य सज्जतेचा तत्काळ आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या घडीला हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता आणि एकंदर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव आणि प्रदुषणाचा विळखा पाहता श्वसनाच्या आजारांचं प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर, सध्या सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचंही सांगितलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : नव्या आठवड्याची सुरुवातही पावसानेच; राज्यातील 'या' भागांमध्ये कोसळधार 

सध्याच्या घडीला जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं चिनी अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त माहिती मागण्यात आली असून, यावेळी चिंतेचं कोणतेही कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही हालचाली सुरु झाल्या असून, राज्यांच्या अधिकाऱ्यांना या वर्षाच्या सुरुवातीला सांगण्यात आलेल्या कोविड-१९च्या संदर्भात सुधारित लक्ष ठेवण्याच्या धोरणाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

कोणाची काळजी घ्यावी ? 

लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये पसरणाऱ्या इन्फ्लूएंझासदृश आजार आणि गंभीर तीव्र श्वसन आजारावर (एसएआरआय) बारकाईने निरीक्षण ठेवण्याच्या सूचना प्रशासनानं केल्या आहेत. शिवाय राज्य अधिकाऱ्यांनी श्वासोच्छासाचे आजार असलेल्या रुग्णांचे नाक आणि घशाचे स्वॅब नमुने विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांना पाठवण्यासही सांगण्यात आलं आहे.