पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने ( Vasandada Sugar Institute ) राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) , राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( NCP Shard Pawar ), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यावेळी उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackarey ) हे ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. देशातील साखर क्षेत्राचा सर्वंकष आढावा पवार यांनी यावेळी घेतला. जगात एके काळी ब्राझील सर्वात जास्त साखर उत्पादन देश होता. आता भारत सर्वात जास्त साखर उत्पादन करणारा देश झालाय. देशात उत्तरप्रदेश एक नंबरवर होता. यावर्षी महाराष्ट्र एक नंबरवर आला आहे, असे पवार म्हणाले.


केंद्र सरकारने निर्यातीला परवानगी दिल्याने साखर निर्यात वाढली. ही साखर उद्योगाला दिलासादायक बाब आहे. यंदा 90 लाख टन साखर निर्यात होणार आहे. यंदा जगातल्या 121 देशांत भारताची साखर पोहोचली. ही विक्रमी निर्यात असल्याचे पवार यांनी सांगितले.


यंदा ऊस उत्पादन वाढल्याने तोडणीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे गाळप हंगाम लांबला. कारखाने आणि शेतकरी दोघेही अडचणीत आले. शेतकऱ्यांना 2 पैसे मिळण्याची खात्री असलेलं एकमेव पीक म्हणजे ऊस आहे. त्यामुळे ऊस लागवड वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणात ऊस उत्पादन वाढताना दिसत नाही. पुढील वर्षी उसाच्या गाळपाचा प्रश्‍न निर्माण होऊ द्यायचा नसेल तर साखर कारखाने सुरू होण्यापूर्वीच नियोजन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आत्मनिर्भर भारतात कृषी आणि ग्रामीण क्षेत्र जोपर्यंत संपन्न होत नाही तोपर्यंत आपला देश संपन्न होणार नाही. साखर उद्योगाचे योगदान महत्वपुर्ण योगदान आहे. देशात सध्या आपण 10 लाख कोटी रुपये इंधन आयातीवर खर्च करतो. भविष्यात हा आकडा 25 लाख कोटींवर जाणार आहे, असे सांगितले.


महाराष्ट्रात इथेनॉल बरोबरच मिथेनॉल तयार करण्याचा विचार केला पाहिजे. देशात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला. त्याची अंमल बजावणी करायची झाल्यास 1 हजार कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे. तेवढी आपली क्षमता नाही. इथेनॉल निर्मिती वाढवण्यासाठी साखरेचं उत्पादन कमी करणे आवश्यक असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला भाषणाची सुरवातच साखर कारखान्यातलं आपल्याला काही कळत नाही अशी कबुली देऊन केली. पवार साहेब आणि गडकरी यांची भाषणे ऐकल्यानंतर काय बोलावे असा प्रश्न पडलाय. आभार मानायला सांगितले असते तरी चालले असते, असे ते म्हणाले.


आम्ही पडलो शहरी बाबू. शहरी माणसाचा साखरेचा संबंध फक्त चहापुरता येतो. यापुढे चहात साखर किती विचारतो तसे गाडीत साखर किती असे विचारता येईल. मला साखरेतील फारसं कळत नाही. साखरेचा विषय आला की मी डावीकडे, उजवीकडे बघतो.


नितीन गडकरींचे भाषण ऐकून मला पण कारखाना काढावा वाटतो. परंतु मी काढणार नाही. कारण त्यांचंच जुनं वाक्य मला आठवतं. एखाद्याला आयुष्यातून उठवायचे असेल तर त्याला साखर कारखाना काढून द्यावा. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्यावर एकच हशा पिकला.