व्हॉटसअॅपवर चॅट करताय... सावधान!
तुमचं व्हॉटसअॅपवरचं चॅट कुणी वाचतंय का? हे एकदा तपासून पाहा... तुम्ही व्हॉटसअॅपवरुन एखाद्याशी काय संवाद साधता, हे कदाचीत दुसरंच कुणीतरी वाचत असण्याची शक्यता आहे, असं होऊ नये म्हणूनच पाहा आमचा हा `विशेष रिपोर्ट`...
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : तुमचं व्हॉटसअॅपवरचं चॅट कुणी वाचतंय का? हे एकदा तपासून पाहा... तुम्ही व्हॉटसअॅपवरुन एखाद्याशी काय संवाद साधता, हे कदाचीत दुसरंच कुणीतरी वाचत असण्याची शक्यता आहे, असं होऊ नये म्हणूनच पाहा आमचा हा 'विशेष रिपोर्ट'...
व्हॉटसअप हॅक होऊ शकतं...
'गप्पांचा कट्टा' म्हणून व्हॉ़टसअॅप लोकप्रिय आहे... पण तुमचं व्हॉटसअॅप सहज हॅक होऊ शकतं... अत्यंत खासगी गप्पांपासून ते ऑफिसच्या कामांपर्यंत सगळं काही या व्हॉटसअॅपच्या मदतीनं होतं. पण हे सगळे मेसेजेस सुरक्षित असतीलच असं नाही... कारण, व्हॉटसअॅप हॅक करणारी अनेक अॅप्स गुगल प्ले स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहेत. फक्त 10 सेकंदांसाठी जरी तुमचा मोबाईल फोन कुणाच्या हातात गेला आणि या अॅपच्या माध्यमातून 'क्यूआर' कोड स्कॅन केला तर तुमच्या सगळ्या व्हॉटसअॅप गप्पा दुसऱ्याला वाचता येतात... तुमच्या नावानं कुणालाही मेसेजही पाठवता येऊ शकतो.
गैरप्रकार रोखणार कसे?
या क्लोनच्या माध्यमातून धमकी देण्यासारखे गैरप्रकारही वाढू शकतात... त्यामुळे अशा अॅप्सविरोधात औरंगाबादमध्ये तक्रार करण्यात आलीय. औरंगाबाद पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय... अशी अॅप प्ले स्टोअरवरुन काढून टाकण्याबद्दल औरंगाबाद पोलीस गुगलला पत्र लिहिणार आहेत.
तुमचा फोन, तुमची माहिती आणि तुमच्या गप्पा सुरक्षित राहण्यासाठी तुमचा फोन अनोळखी माणसाच्या हाती देऊ नका... अशी अॅप काढून टाकण्यासाठी 'गुगल'ला कदाचित वेळ लागेल पण फसवणूक होणार नाही, याची खबरदारी तुम्ही घ्या.