प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : एका क्षणाला त्या सगळ्यांनाच वाटलं आयुष्य संपवून टाकावं. त्यांनी सरळ कोल्डड्रिंक आणलं, त्यात विष टाकलं आणि ते प्यायलंही. घरात दीड वर्षींची दोन गोंडस मुलंही होती. त्यांनाही विष दिलं आणि सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. अलिबागमधली ही धक्कादायक घटना. का उचललं असेल पाटील कुटुंबीयांनी एवढं टोकाचं पाऊल. रुग्णालयात उपचार घेणारे हे सगळे एकाच कुटुंबातले सदस्य. या सगळ्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलाय. तेही विषप्राशन करुन. हे सगळे अलिबाग तालुक्यातल्या आक्षी गावातले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामचंद्र पाटील त्‍यांची पत्‍नी रंजना पाटील सून कविता पाटील, दीड वर्षांची नातवंडं स्‍वराज आणि स्‍वराली पाटील या पाचही जणांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुपारी 12 वाजण्‍याच्‍या सुमाराला घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय. या सगळ्यांनी शीतपेयातून विषारी द्रव्य घेतलं. त्यानंतर सगळ्यांना उलट्या सुरू झाल्या. दीड वर्षांचे स्वराज आणि स्वराली रडायला लागले, तेव्हा शेजाऱ्यांना आवाज ऐकायला आला. त्यानंतर या पाचही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


मात्र हे नेमकं कशातून घडलं, वादाचं कारण काय होतं, हे अजून समोर आलेलं नाही. रामचंद्र पाटील हे रिक्षा चालवण्‍याचा व्‍यवसाय करतात. तर त्‍यांचा मुलगा राहुल हा रबाळेमध्ये नोकरीनिमित्त राहतो. 



आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत हे कुटुंब जागं होतं. सकाळी घरातून काहीच हालचाल दिसेना आणि लहान मुलांच्या रडण्याचा आवाज यायला लागला, त्यामुळे शेजारच्या सुनीता पाटील यांना संशय आला, आणि त्यांनी आजूबाजूच्यांना गोळा करुन पाटील, यांच्या घराचं दार उघडलं.


तेव्हा समोर आलं ते धक्कादायक होतं. घरातले तिघेही जमिनीवर पडले होते आणि दोन लहान मुलं रडत होती. पाटील कुटुंबात कोणताही वाद नव्‍हता, असं सांगण्यात येतंय. मग या पाचही जणांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचा तपास सुरू आहे.