महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक? हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला?
हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? नेमका काय आहे हुनमान जन्मस्थानाचा वाद जाणून घेवूया.
Hanuman Jayanti 2024 : चैत्र पौर्णिमे दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे. संपूर्ण देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा होता. दरम्यान, हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला यावरुन नेहमीच वाद विवाद होत असतात. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक नेमक्या कोणत्या राज्यात हनुमानाच्या जन्म झाला. जाणून घेवूया नेमका काय आहे हनुमान जन्मस्थानाचा वाद
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळचा अंजनेरी पर्वत हे हनुमानाचं जन्मस्थान असल्याची श्रद्धा
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळचा अंजनेरी पर्वत हे हनुमानाचं जन्मस्थान असल्याची आपली श्रद्धा आहे. हनुमानाची माता अंजनी हिच्यावरूनच अंजनेरी हे नाव पडलं. इथं अंजनीमातेचं आणि हनुमानाचंही मंदिर आहे. मात्र, कर्नाटकातील किष्किंधा हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचा दावा किष्किंधा देवस्थानचे आचार्य गोविंदानंद महाराज यांनी केला होता. आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचे दाखले दिले होते.
केवळ अंजनेरी आणि किष्किंधाच नव्हे तर देशात 9 ठिकाणी हनुमानाचं जन्मस्थान असल्याचा दावा केला जातो. नाशिक, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटकमध्ये हनुमान जन्म झाल्याचा दावा केला जातो. हनुमानाचा जन्म अंजनाद्री पर्वतावर झाल्याचा दावा तिरुमला तिरुपती देवस्थाननं केलाय.
हनुमान जन्मवादाबाबत त्र्यंबकेश्वरमध्ये आयोजित धर्मसभेत शास्त्रोक्त वादविवाद झाला होता. त्यात किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी, तर अंजनेरी ही तपोभूमी असल्याचं सांगण्यात आले. मात्र, नाशिकच्या महंतांनी आणि पंडितांनी हा दावा फेटाळून लावला होता.
यानंतर एका विशेष बैठकीत नाशिकही हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे मान्य करण्यात आलंय. अयोध्या रामजन्मभूमी न्यासाचे गंगाधर पाठक यांनी हे मान्य केलंय. शास्त्रार्थ चर्चेतील वादातून बाहेर आलेला निष्कर्ष जाहीर करण्यात आला. त्यात नाशिक हेच हनुमानाचं जन्मस्थान असल्याचं मान्य करण्यात आलंय. गोविंदानंद यांनी आता हनुमान जन्मस्थानाचा आग्रह सोडावा असं पाठक यांनी बजावलं.
हनुमानाचा जन्म कर्नाटकात झाल्याचा दावा
यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानानं नवा वाद निर्माण झाला होता. हनुमानाचा जन्म कर्नाटकात झाल्याचा दावा त्यांनी केला होता. कर्नाटक आणि उत्तरप्रदेशचा संबंध त्रेतायुगापासून आहे, श्रीरामभक्त हनुमानाचा जन्म कर्नाटक झालाय असा दावा योगींनी कर्नाटकात जाऊन केला होता. तर नाशिकचे महंत अनिकेत देशपांडे यांनी योगींच्या दाव्याला विरोध केला होता.
सोलापूर जिल्ह्यातील कुगाव हे हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा
हनुमान जन्मस्थळाच्या वादात आता सोलापूरकरांनीही उडी घेती होती. सोलापूर जिल्ह्यातील कुगाव हे हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा इथल्या नागरिकांनी केलाय. करमाळा तालुक्याच्या कुगाव ग्रामपंचायतीकडं काही पौराणिक पुरावे आहेत, असा दावा गावकरी करतायेत. भीम महात्म्य या पौराणिक ग्रंथातील 33 व्या अध्यायात हनुमान जन्माचे वर्णन केले आहे. ज्यात कुगाव इंथंच हनुमानाचा जन्म झाला आहे असा उल्लेख आहे, असं गावक-यांचं म्हणण आहे. विष्णूच्या दश अवतार पैकी कुर्म अवतार या ठिकाणी झाला आहे. येथेच हनुमान जन्माला आले. म्हणून या गावात हनुमान तिर्थ आहे. असा ही उल्लेख पौराणिक महात्म्यमध्ये असल्याचं गावकरी सांगता.