झी मीडिया, वाल्मिक जोशी, जळगाव :  धरणाचे काम सुरू असून या धरणावर असलेला मातीचा बंधारा फुटला आहे. जळगावमध्ये ही दुर्घटना घडली आहे.  जोंधनखेडा येथील धरणाचे काम सुरू असून या धरणावर असलेला मातीचा बंधारा फुटल्याने धरणाचे पाणी धरणाखालील गावांमध्ये शिरले आहे. पुसळधार पावासमुळे ही दुर्घटना घडली आहे. ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील तातडीने या दुर्घटनेचा आढावा घेतला. 
 मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा येथील धरणाचे काम सुरू आहे.  या धरणावर असलेला मातीचा बंधारा फुटल्याने धरणाचे पाणी धरणाखालील गावांमध्ये शिरले असून या गावांना धोका देखील निर्माण झाला आहे मात्र तातडीने या ठिकाणी ग्रामस्थांची राहण्याची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून रावेर यावल व मुक्ताईनगर तालुक्यात सातपुडांच्या पर्वतरांगात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. दरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. गिरीश महाजन यांनी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांशी संवाद साधून तात्काळ मदतीचे आश्वासन दिले आहे. 


दरम्यान यावी ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा या गिरीश महाजनांसमोर मांडल्या असून नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश यावेळी गिरीश महाजन यांनी तहसीलदार व तलाठी यांना दिले आहेत. 


कृष्णा नदी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा


साताऱ्यातील धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत आहे.  धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे 2000 क्युसेक पाण्याचा कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणा खालील मौजे बलकवडी, परतवडी, कोढवली नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील ग्रामस्थांना नदी पात्रात जावू नये. तसेच त्यांनी जनावरे नदी पात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे. धोम बलकवडी धरण 95 टक्के भरले असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.


पुजारीटोला धरणाचे 13 दरवाजे उघडले


गोंदिया जिल्ह्यात बरसलेल्या दमदार पावसामुळे पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून 279.500 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. गोंदिया जिल्ह्यात दमदार पाऊस बरसल्याने पुजारीटोला धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत होती. त्यामुळे याआधी १० दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र, त्यात पुन्हा वाढ करून एकूण १३ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आलेत. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.