Who is Raja Thakur: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (CM Eknath Shinde) चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून श्रीकांत शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा संजय राऊतांचा दावा आहे. संजय राऊत यांनी पत्रात गुंड राजा ठाकूरचा उल्लेख केला आहे. यामुळे हा राजा ठाकूर नेमका कोण आहे अशी चर्चा रंगली आहे. 


संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिय देवेंद्रजी,


जय महाराष्ट्र


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.



गुंड राजा ठाकूर नेमका कोण?


राजा ठाकूर (Raja Thakur) हा ठाण्यातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्या आणि हत्येता प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचं दीपक पाटील गटाशी वैर आहे. 



आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया


संजय राऊतांच्या पत्रावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून याची गंभीर दखल घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडतायत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. 


"ज्या गद्दार आमदारांनी गोळीबार केला त्यांच्यावर कुठेच कारवाई झाली नाही, अनेक गद्दार आहेत ज्यांनी धक्काबुक्की किंवा इतर काही केलं आहे त्यांच्यावरही अजून कारवाई झालेली नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतोच," असंही त्यांनी सांगितलं.


"संजय राऊत खोटे आरोप करतात. श्रीकांत शिंदे यांना बदनाम करू पाहतात. कोणतेही पुरावे नसताना नाहक आरोप करण्याचं काम केलं जात आहे," असा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.