पुणे : खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला कुणाचाही विरोध नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. खासदार उदयनराजे यांच्या विरोधकांनी शरद पवार यांची सोमवारी बारामतीमध्ये भेट घेतल्याची चर्चा होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशिकांत शिंदे, रामराजे निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले  या नेत्यांनी यावेळी उदयनराजेंविरोधात पवारांकडे तक्रारी केल्याचंही बोललं जात होतं. मात्र यात तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण पवारांनी दिले आहे. साताऱ्यामध्ये लोकसभा तसेच राज्यसभेच्या दृष्टिकोनातून सर्वांशी चर्चा सुरु आहे. सर्वजण एकत्रित विचार करून पुढील गोष्टी ठरवणार असल्याचं पवार यांनी सांगितले.


उदयनराजे चुकून शरद पवारांच्या गाडीत बसले आणि मग...


दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपली उमेदवारी शाबूत ठेवण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजेंचे यांचे तिकिट कापण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, खुद्द शरद पवार यांनी याला पूर्णविराम देताना खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला कुणाचाही विरोध नसल्याचा खुलासा केला. त्यामुळे ही चर्चाच असल्याचे स्पष्ट झालेय.


पवारांनी फसवा-फसवी केली तर बघून घेऊ - उदयनराजे भोसले


बारामतीत शरद पवार आणि अन्य नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त हाती आले होते. राजकीय तज्ज्ञांच्या मते उदयनराजेंची लोकसभेची उमेदवारी कापण्यासाठीच ही भेट झाल्याचा अंदाज होता. उदयनराजे भोसले यांच्याऐवजी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी या नेत्यांनी आग्रह धरला. त्यामुळे आता शरद पवार याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी उदयनराजेंनी शरद पवारांची भेट घेतली तेव्हादेखील दोन्ही नेत्यांमध्ये खासगीत चर्चा झाली. त्यावेळीही राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी वेगळ्या बाजूला आणि खासदार उदयनराजे वेगळ्या बाजूला अशी परिस्थिती सातारा विश्रामगृहात पाहायला मिळाली होती.


दरम्यान, खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला कडक इशारा दिला होता. तसेच भाजपनेही उदयनराजे यांना गळाला लावण्यासाठी चाचपणी केल्याची चर्चा होती. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही साताराऱ्यात राष्ट्रवादीला हादरा देण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून काय निर्णय होतोय, याकडे लक्ष लागले होते. मात्र, खासदार उदयनराजे यांनीच बाजी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. साताऱ्यात त्यांचीच सत्ता असणार हे आता स्पष्ट झालेय.