Weather Updates: महाराष्ट्रात पाऊस अडवला कोणी?
महाराष्ट्रात पावसानं फिरवली पाठ, पावासाची कुणी अडवली वाट?
किरण ताजणे झी 24 तास पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं हुलकावणी दिली. सध्या काही ठिकाणी पाऊस परतला पण तरीही मुसळधार पावसाची प्रतीक्षा सर्वांना आहे. जून महिन्यात दमदार एन्ट्री मारणाऱ्या पावसाची वाट आता नेमकी कोणी अडवून धरली असा प्रश्न पडत आहे. जूनमध्ये धडाक्यात आगमन करणा-या पावसानं अचानक हुलकावणी का दिली?
पाऊस आला तो धडाक्यात पण आता त्यानं अशी काही दडी मारली की शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. काही ठिकाणी तर दुबार पेरणीचंही संकट ओढवतं का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातल्या पावसाला अडवून धरलं आहे ते आफ्रिकन वा-यांनी. आता प्रश्न पडला असेल त्यांचा नेमका काय संबंध आणि हे कसं शक्य आहे पाहुया.
गेल्या तीन आठवड्यांपासून देशात आफ्रिकेच्या वाळवंटातले वारे वाहत आहेत. या वा-यांमुळे 21 जूनपासून मान्सूनची हालचाल मंदावली आहे. आफ्रिकेतले हे गरम वारे वाळवंटातले धूलिकण बरोबर आणतात. ते ढगांत गेल्यावर बाष्प शोषून घेतात
11 जुलैपर्यंत हे आफ्रिकन वारे असेच राहणार आहेत. त्यानंतरच देशात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पावसानं ओढ देण्याचं आणखी एक कारण म्हणजे कमी झालेला सूर्यप्रकाश. मे महिन्यात सूर्यप्रकाशाचा कालावधी 7 ते 8 तास असला तर पुढे चांगला पाऊस पडतो; पण यंदा मे महिन्यात पाऊस होता.
बदलेल्या या हवामानामुळे सूर्यप्रकाश अवघ्या चार तासांचाच मिळाला याचा परिणाम पावसावर झाला असंही सांगण्यात येत आहे. आता 11 जुलैपासून हवेचा दाब कमी होतो आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा 13 ते 17 जुलैपर्यंत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.
जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा यंदा पावसाविना कोरडा गेला. त्यामुळे राज्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे. राज्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भागांत सरासरी उणे 64 टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आता हे संकट कधी दूर होणार याकडे बळीराजासह सर्वांचे डोळे लागले आहेत.